Thursday, March 15, 2007

गुलज़ार

हासणे माझे तसे गुलज़ार होते
रोखले अश्रु किती समजुतदार होते

साधले त्यांनी कितीही डाव माझे
जिंकणारे ही इथे हरणार होते

ना मला कळले जगाचे कायदे
जे दिले ते घेतले जाणार होते

कालच्या दंग्यात काही पेटलेले
माणसाच्या ते मतीचे जोहार होते

अर्थ शब्दांना जसे सोडून जावे
मागे तुझ्या, माझे तसे होणार होते

Tuesday, March 6, 2007

अव्यक्त

माझे कुणा म्हणु मी, सारे निघुन गेले
घेऊन चांदण्याला तारे निघुन गेले

खडकाळ भेटला ना दर्या तुला किनारा
ठेचाळणे तुझेही आता ठरून गेले

माझ्या भलेपणाचे सत्कार हे असे की
सारेच दोष माझ्या माथी करून गेले

उरले असे कितीसे आयुष्य सोबतीला
मी ही तयार आता सारे बघुन गेले

तू गूढ, ती म्हणाली, अव्यक्त तू कसा रे
नुकतेच लेखणीला सारे कळुन गेले

हे कसे

हे असे की श्वासही ना घ्यायचे
ठरवले, नाही पुन्हा भेटायचे

ठेवुया लक्षात आपण जन्मभर
वायदे होते कुठे विसरायचे?

पारव्यांनी बांधले घरटे नवे
वादळाला हे कसे समजायचे?

शब्द होई प्राण, ओठी कापरा
मी कधी काहीच ना बोलायचे

लावला चेहरा नवा, मी कोरडा
आसवा, नाही पुन्हा रे यायचे

बोललो मी जे नको ते नेमके
हे असे नेहमीच माझे व्हायचे

बंद कर हे काळजाला जाळणे
’आशु’ तुला कोणी किती सांगायचे?

Monday, March 5, 2007

हूल

कुणीतरी हूल द्यावी माझीया मना
ही रात्रही तशीच आहे चांदण्याविना

सागराला तहान आहे कोणती अशी
की नभाने भरून यावे असे पुन्हा पुन्हा

तू खरी का कल्पना तू भावनेतली
साकारलेली मुर्तिमंत तूच कामना

नव्या दिशा, नवी उन्हे, चालणे नवे
चालणारा मीच आहे एकटा जुना

Sunday, March 4, 2007

मी

आसवांना सारखे बोलावतो मी
वेदना माझ्या पुन्हा ओलावतो मी

गेली निघुनी ती जशी आलीच नाही
हे असे आता मला समजावतो मी

बोललो मी, जा, तुझा कोणीच नाही
का पुन्हा आता तुला बोलावतो मी

हा पुन्हा मी घेतला हातात पेला
घेतल्या शपथा कशा, रागावतो मी

आठवांचा गंध या मातीस येतो
पावसांत जाणे अताशा टाळतो मी

बहरली आहे, कधीची, रातराणी
का अता जाईजुई गंधाळतो मी

फाटकी पाने किती गोळा करु
का पुन्हा आयुष्य माझे चाळतो मी

Saturday, March 3, 2007

रुपगंधा

आता जरासे, गीत माझे, गुणगुणाया लागली
स्वप्नात माझ्या, ती स्वत:चे स्वप्न पहाया लागली

मोकळ्या केसांत वारा मोगरा गंधाळता
श्वासांतुनी ती रुपगंधा दर्‌वळाया लागली

कालच्या त्या आठवांचे काय मी आता करु
आता इथे माझ्यासवे ती जाणवाया लागली

वादळे दोन्ही मनांच्या अंतरी घोंगावली
मी तिला अन ती मलाही सावराया लागली

Wednesday, February 28, 2007

नातं

तुझ्या माझ्यातलं नातं
जसा आभाळाचा श्वास
कधी तापलेलं उन
कधी पावसाचे भास

Tuesday, February 27, 2007

तू

आज अचानकच तू दिसलास. गर्दीत हरवल्यासारखा..
माझ्या डोळ्यांनी अगदी बरोबर शोधुन काढलं तुला..
हो..हो तुच होतास तो खराखरा…भास नव्हता तो रोजच्यासारखा…

तु ही पाहिलेस मला….एक क्षण थबकलास तू…अगदी तुझ्याही नकळत…पण मला जाणवलं ते.
एक क्षण तुझ्या मनात चलबिचल झाली.. पुढच्या क्षणी…. किती परका झालास तू…
इतक्या लवकर…ओळखही न पटण्याइतपत.

फ़ार काही अपेक्षा नाहीत रे माझ्या….कशी आहेस इतकं विचारलं असतंस तरी पुरलं असतं मला…
इतकी का मी वाईट आहे? माझ्या काही चुका झाल्या असतील पण…पण म्हणुन त्यांची इतकी शिक्षा? जाऊ दे ! नशिब माझं दुसरं काय… तुला तरी कसा काय दोष देऊ मी ?

ए पण तुला माहितीये? मी सारं जपुन ठेवलयं माझ्यापाशी…..
तू दिलेला प्रत्येक क्षण….. प्रत्येक आठवण….
सारं काही आहे माझ्यापाशी.. माझ्या मनात खोलवर…दगडावर जसं कोरुन ठेवतात ना तसं… कायमचं…
तितकंही पुरेल मला….निदान या जन्मी तरी…

Monday, February 26, 2007

प्रीत

आज मेघ पांघरुनी अंधुकली चांदरात
गंध-गंध गारव्यात धुंद-धुंद आसमंत

मालवु नकोस दीप फ़ुंकरुनी आग आज
पाहु दे मज एकवार सावलीत लाज लाज

चेतवू तनामनांत प्रणयाची दीप्‌ज्योत
उजळतील लक्ष दीप देहाच्या मंदिरात

बावरुनी आज प्रिये पाहु नको असा अंत
जाण तू असे अशीच, मीलनात पुर्ण प्रीत

दीपस्तंभ








सार्‍यांनाच प्रवासी होता येत नसतं
प्रेमाच्या प्रवासाला जाता येत नसतं...
लाटांचे धक्के खात जगावंच लागतं
एखाद्याला 'दीपस्तंभ' बनावंच लागतं

बगळा

तळ्याकाठी एक बगळा
सुखात रहात होता...
पाण्यात कोण सुखी आहे
हे दररोज पहात होता

Friday, February 23, 2007

भावबंध

एकांती मजसी तू भेटलीस जेव्हा
माळले होतेस तू नभातले तारे
बोलतांना प्रीतीचा शब्द-शब्द तेव्हा
तोडले होतेस तू भावबंध सारे


हासुनी हातात तुझा हात मी घेता
वादळात वारा ही हरवुनी गेला
स्पर्श तुझा हळुवार अन्‌ वेडावणारा
जगण्याचा अर्थ नवा सांगुनी गेला


फ़ुलली ती रातराणी मनी तुझ्या तेव्हा
सांग तू होतीस ना सखे लाजलेली
वचन सात जन्मांचे दिलेस तू जेव्हा
दिसली ती सरतांना रात्र जागलेली

Saturday, February 17, 2007

बाजार

झाकोळल्या घरात माझ्या अजुनही प्रकाश आहे
की तुझ्या तो आठवांचा अंधुकसा आभास आहे

बंधनांत कोणत्या मी बांधला गेलो असा
की मला तो बांधणारा तव श्वासांचा पाश आहे

आरश्या समोर मी अन्‌ आरसा वेडात आहे
वेळी-अवेळी आरश्याला पाहण्याचा छंद आहे

दिल्या घेतल्या शपथांना शब्दांचा आधार आहे
की कुणी हा मांडलेला शब्दांचा बाजार आहे

Friday, February 16, 2007

तुला हवं म्हणुन

नजरेत तुझ्या सारंच दिसतंय
तरी तुला हवं म्हणुन
मी विचारल्यासारखं करीन
अन्‌ तू लाजल्यासारखं कर

चंद्र

चांदण्या रात्री, ती शेजारी
अन्‌ मी विचार करतोय
तो आकाशातला चंद्र कुठे लपलाय?

Thursday, February 15, 2007

गाणे

गाणे उदासवाणे सारे तुझ्याविना
भेटायला मला तू येशील का पुन्हा

नयनी तुझ्या कसा मी हरवुन पार गेलो
तू सांग मी कुठे गं शोधु मला पुन्हा

होते दिले तुला मी मागे कधीतरी ते
येशील घेउनी का तू माझिया मना

थोडी हवीहवीशी, थोडी नवीनवीशी
आहेस कोण माझी सखये गं सांग ना

आहे मनात माझ्या अजुनी तुझा सुगंध
फ़ुलवी मनी फ़ुलोरे असे पुन्हा पुन्हा

मी जाणतो तुलाही माझाच नाद आहे
आहे खरेच का ही माझीच कल्पना

काही तुझ्यातले तू देशील का मलाही
रेशिमस्पर्श तो अन्‌ हळुवार कामना

माझे मला कळेना प्रारब्ध काय माझे
आलीस एकदा तू , येशील का पुन्हा

हुंदके

चांदण्यांच्या पावलांनी तू अता येऊ नको
स्वप्न माझे चंद्रमोळी तू अता येऊ नको

कालच्या स्वप्नास माझ्या राहु दे आहे तसे
स्वप्नवेडया धुंद रात्री जाग तू देऊ नको

चंचला तू, पावसाच्या आर्ततेला साथ तू
आसवांच्या सागराला आग तू देऊ नको

जा जगाला सांग मी आहे कसा वेडाखुळा
होतीस तू माझी कधी हे मात्र तू सांगु नको

राहिले मागे जरासे जीवघेणे हुंदके
राख झाल्या आसवांना हासणे मागु नको

दिवाळी

हरएक पाहतो मी स्वप्नातली दिवाळी
सत्यात काय पाहु आहेच रात्र काळी

होतीस रातराणी तू गंधधुंद रात्री
वाटे धुके असावे गंधाळले सकाळी

मी एकटा असावे बोलु नये कुणाशी
सांगु कशी कुणाला, माझी व्यथा निराळी

कोठेतरी मिळावा माझ्या मना विसावा
मारू नयेत हाका आता कुणी अवेळी