आसवांना सारखे बोलावतो मी
वेदना माझ्या पुन्हा ओलावतो मी
गेली निघुनी ती जशी आलीच नाही
हे असे आता मला समजावतो मी
बोललो मी, जा, तुझा कोणीच नाही
का पुन्हा आता तुला बोलावतो मी
हा पुन्हा मी घेतला हातात पेला
घेतल्या शपथा कशा, रागावतो मी
आठवांचा गंध या मातीस येतो
पावसांत जाणे अताशा टाळतो मी
बहरली आहे, कधीची, रातराणी
का अता जाईजुई गंधाळतो मी
फाटकी पाने किती गोळा करु
का पुन्हा आयुष्य माझे चाळतो मी
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment